Tuesday, November 29, 2016

कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम



कोरडवाहू शेतीची उत्पादन क्षमता वाढविणे त्यासाठी विविध सिंचन पर्यायांचा वापर करणे व त्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम राबविला जातो. कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म व इतर सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाते.

योजनेचे स्वरूप :
कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मुलस्थानी मृद-जलसंधारणासह साखळी बंधारे, शेततळी या माध्यमातून संरक्षीत सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सुक्ष्म सिंचनाचा वापर करून सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे, शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रीया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पिक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण योजनेंतर्गत केले जाते.

लाभार्थी निकडीचे निकष :
अल्प, अत्यल्प भुधारक तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते. शेतकरी गटामध्ये सहभागी होवून गटाधारीत उपक्रम राबविण्यास तयार असलेले शेतकरी, मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा अवलंब करणारे शेतकरी, सुक्ष्म सिंचन पध्दती अवलंबण्यास तयार असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभाचे स्वरूप :
राज्य योजनेंतर्गत अनुदानाचे प्रमाण १00 टक्के आहे. मनुष्यबळ विकासांतर्गत कर्मचारी, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी संघटना, शेतकरी अभ्यास दौरे इत्यादी उपक्रम राबविले जातात. संरक्षित सिंचन सुविधेंतर्गत साखळी सिमेंट बंधारे, शेततळी, पाईप पुरवठा, विद्युत किंवा इलेक्ट्रीक पंपसेट पुरवठा, सुक्ष्म सिंचन इत्यादींचा पुरवठा केला जातो. मुलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारीत वाणांची प्रात्यक्षिके व मृद तपासणी, नियंत्रित शेती अंतर्गत हरीतगृह व शेडनेट उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. प्राथमिक कृषी प्रक्रीया व पणन अंतर्गत दाल मिल, भरडधान्य प्रक्रीया, संयंत्र, कृषी माल वाहतुकीसाठी वाहन खरेदी प्लॅस्टिक क्रेड इत्यादी सुविधा अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जातात. योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांना देय अनुदानाची रक्कम धनादेशाद्वारे लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज व अर्जाचे नमुने :
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या लाभार्थ्यांना आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागतात तेथेच अर्जाचे नमुने उपलब्ध होतात.

संपर्क व अधिक माहिती :
संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.

संबंधित अधिकारी :

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ