विविध प्रकारच्या पिकांवर वारंवार कीड व
रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे शेतकर्यांना नुकसान सोसावे लागते. असा प्रसंग
उद्भवूच नये तसेच उद्भवल्यास त्यावर तातडीने व्यवस्थापनाच्या उपाययोजना करता
याव्या म्हणून पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रापसॅप हा
कार्यक्रम राबविला जातो. सन २००९-१० पासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
योजनेची व्याप्ती :
सोयाबीन, कापूस, तूर,
हरभरा या महत्त्वाच्या प्रमुख पिकावर वारंवार तसेच
आकस्मिकरीत्या उद्भवणार्या किड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे नुकसान
होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता किड व रोग
सर्वेक्षण व व्यवस्थापन यासाठी प्रभावी किड व रोग सर्वेक्षण सल्ला व जनजागृती
याबाबतची यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने पिकावरील किड व रोग सर्वेक्षण व सल्ला
हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येतो.
लाभार्थी निवडीचे निकष, नियम, अटी :
या प्रकल्पाचा लाभ सोयाबीन, कापूस,
तूर, हरभरा या पिकांचे उत्पादन
घेणारे सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतात.
योजनेचे स्वरूप :
शेतकर्यांमध्ये किड व रोगाची ओळख निर्माण
करणे,
त्यांना प्रशिक्षित करून किडरोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे.
किडरोगाच्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान टाळून
उत्पादन वाढ करणे. सोयाबीन, कापूस, भात,
तूर व हरभरा या पिकांचे सर्वेक्षण करून हंगामनिहाय प्रमुख
किडरोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतकर्यांमध्ये जाणीव निर्माण करणे व त्यांना वेळीच
उपयायोजना सूचविणे. किडरोग प्रादुर्भावित क्षेत्रासाठी आपात्कालीन परिस्थितीत पीक
संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे. किडरोगाच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे
होणारे नुकसान टाळण्यासाठी योजनेंतर्गत काम केले जाते.
लाभाचे स्वरूप :
शेतकर्यांना आठवड्यातून दोनदा प्राप्त
होणारा किड व रोग नियंत्रणाविषयीचा सल्ला मोबाईल एसएमएसद्वारे पाठविला जातो.
क्षेत्रीय कर्मचार्यांमार्फत कृषी वार्ताफलकावर प्रत्येक गावामध्ये किड व रोग
नियंत्रणाविषयीचा सल्ला लिहून माहिती दिली जाते. ५० टक्के अनुदानावर किटकनाशके व
बुरशीनाशके उपलब्ध करून दिले जातात.
अर्ज व अर्जाचे नमुने :
संबंधित शेतकरी लाभार्थ्यास योजनेच्या
लाभासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी
कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. याच ठिकाणी अर्जाचे नमुने उपलब्ध होतात.
संपर्क व अधिक माहिती :
संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी
कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.
संबंधित अधिकारी :
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांच्या देखरेखीत आणि मार्गदर्शनात अमलबजावणी होते.