Monday, November 7, 2016

अनुभवी व अभ्यासू नागरिकांना आवाहन-शेतकर्‍यांसाठी योजना बनविण्याची संधी




जिल्हयात बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध योजना व उपक्रम शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नागरिकांना शेतकर्‍यांसाठी योजना तयार करण्याची संधी या अभियानातून उपलब्ध झाली आहे. या योजनांचे प्रारूप तथ माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आणि शेतकरी उपयोगी उपक्रमांसाठी ग्रामस्तरीय समित्यांना एक लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. यातून गावातील अनेक गरजू शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत वितरीत होत आहे. अशाच प्रकारची मदत योजनेच्या माध्यमातून मिळावी, यासाठी विविध xयोजना आखण्याचे काम अभियानातून सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू लोकांच्या दृष्टीकोणातून शेतकरी व शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावेल या हेतूने नाविन्यपूर्ण योजनांचे प्रारूप मागविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील भू-भाग व जलविषयक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकर्‍यांनी पिकांनुसार जल व्यवस्थापन कसे करावे, पारंपरिक कौशल्य व व्यवसायविषयक वृद्धी करणे, शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकास तथा विविध व्यावसायिक कौशल्यवृद्धी प्रशिक्षण, शेतमालावरील प्रक्रिया उद्योग, शेतमालासाठी बाजारपेठ व विपणन व्यवस्थापनाबाबत नियोजन करणे, शेती कसण्याचे नाविन्यपूर्ण तंत्र, विविध धान्य व शेतीमालाची प्रतवारी करण्याचे तंत्र व हंगामानुसार नियोजन करणे, विविध जोडधंदे उभारणे आदि विषयावर योजना तयार करण्यात येणार आहे.

योजना वस्तुनिष्ठ व प्रत्यक्षपणे करण्याजोगी असावी. तसेच सादर करण्यात येणारे नियोजन, योजना ही कमी खर्चाची, किफायतशीर असावी. जेणेकरून शेतकर्‍यांना सद्य:परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल. तसेच योजना सुलभ व फायदेशीर ठरेल अशी असावी, शेतकर्‍यांची सकारात्मक मानसिकता तयार होईल अशा यशोगाथा व माहितीपूर्ण लेख यामध्ये असावे. यासाठी संबंधित नागरिकांनी योजनेचे नाव व स्वरूप, योजनेत शेतकर्‍याने करावयाची अपेक्षित कार्यवाही, अपेक्षित लाभ याची परिपूर्ण माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.