Wednesday, November 23, 2016

मागेल त्याला शेततळे योजना




             शेतकर्‍यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासन यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहे. असे असले तरी या प्रयत्नातून प्रत्येकास ही सोय उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळेच प्रत्येक शेतावर शेततळ्याच्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी फेब्रुवारी २0१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. सिंचनाची सोय होण्यासोबतच पावसाचे पाणी भूगर्भात मुरविण्याचे मोठे काम 'मागेल त्याला शेततळे' या योजनेतून होणार आहे.

योजनेची व्याप्ती : शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलबधता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली होती. सदरचा कार्यक्रम हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

लाभार्थी निवडीचे निकष/अटी : शेतकर्‍यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.0 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. कमाल र्मयादा नाही. लाभार्थी शेतकर्‍यांची जमीन शेततळ्याकरीता तांत्रिकदृष्टया पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा. दारिद्ररेषेखालील(बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे. त्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्ये जेष्ठता यादीतून सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते.

योजनेचे स्वरूप : राज्यातील पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीसाठी जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळे तयार करणे, आकारमाननुसार अनुदानावर अर्थसहाय्य योजनेंतर्गत दिले जाते.

लाभाचे स्वरूप : शेतकर्‍यांचे जिवनमान उंचाविण्यासाठी तसेच टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकर्‍यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करणे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व लाभार्थीने क्षेत्रीय कर्मचार्‍यांच्या शिफारशीसह तालुका कार्यालयास लेखी कळविल्यावर देय रक्कम संबंधीत लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

अर्ज कोठे करावा : योजनेंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध होऊ शकतो.

संपर्क व अधिक माहिती : संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.

संबंधित अधिकारी : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ