Wednesday, July 13, 2016

बळीराजा चेतना अभियान म्‍हणजे काय?

बळीराजा चेतना अभियान


        आपल्‍या जिल्‍हामधील शेतकरी नैसर्गिक आपत्‍तीतून उदभवणारी नापिकी, कर्जबाजारीपणा इत्‍यादी आर्थिक,सामाजिक, नैसर्गिक कारणामुळे ञस्‍त आहे. याचाच परिणाम म्‍हणून दिवसेंदिवस शेतकरी आत्‍महत्‍या प्रश्‍न गंभिर होत आहे. अशा वेळी शेतक-यांच्‍या मनामध्‍ये जगण्‍याची जिदद निर्माण करणे, त्‍याला मिञत्‍वाचा नात्‍याचा सुखद स्‍पर्श देऊन त्‍याच्‍या मनामध्‍ये जिवनाविषयी प्रेम निर्माण करणे व त्‍याला आत्‍महत्‍येसारखे घातकम पाऊल उचलण्‍यापासुन प्ररावृत्‍त करणे, आवश्‍यक झाले आहे. या कामाकरीता जिल्‍हातील प्रत्‍येक सुजाण नागरीक, शिक्षक, व्‍यापारी, नोकरदार वर्ग, आदी नागरीकांनी आपआपली जबाबदारी ओळखुन बळीराजा चेतना अभियानाच्‍या माध्‍यामातून भुमिका बजावण्‍याची वेळ आली आहे. बळीराजा चेतना अभियान म्‍हणजे काय ? हे आपण जाणून घेऊ या !

१) जिल्‍हातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मनापासून विचार करावा की मी शेतक-यासाठी काय करू शकतो ? प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या मनामध्‍ये हा विचार उमटणे हाच बळीराजा चेतना अभियानाचा खरा सार आहे.

२) किर्तनकार, प्रवचनकार, नाटककार, चिञपट निर्माते, लेखक, व्‍याख्‍याते, प्रबोधनकार, इत्‍यादींनी त्‍यांच्‍या अंगी असणा-या कौशल्‍याचा वापर करून शेतक-यांमध्‍ये जगण्‍याची उमेद निर्माण करून त्‍यांना प्रोत्‍साहीत करण्‍याची भूमिका पार पाडणे, शेतक-यांच्‍या मनात जागवणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

३) सामान्‍य नागरीकांनी शेतक-यांच्‍या हिताची भूमिका घेणे. सामान्‍य नागरीकांनी शेतक-यांचा शेतमाल थेट खरेदी करणे, जेणेकरून शेतक-यांला त्‍याच्‍या शेतमालाकरीता योग्‍य किंमत मिळेल व बळीराजाच्‍या हातात चार पैसे जास्‍त मिळून त्‍याला आर्थिक संकटावर मात करणे शक्‍य होईल. याकरीता सर्वसामान्‍य नागरीकांनी शेतक-याच्‍या जीवनामध्‍ये आनंद, समृध्‍दी कशी येईल याचाच विचार सदैव करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

४) मान्‍यवर पञकार मंडळी शेतक-यांशी निगडीत विविध घटनांचे वृत्‍तांकन करीत असतात. त्‍यामध्‍ये शेतक-याच्‍या मनाला उभारी देतील अशा शेती क्षेञाशी निगडीत यशेागाथा मांडणे, शेतक-याला प्रयत्‍न करण्‍यासाठी प्रवृत्‍त करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

५) शाळा, महाविदयालयीन विदयार्थी हे वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, वादविवाद स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धा, चिञकला स्‍पर्धा, बोधवाक्‍य स्‍पर्धा, इत्‍यादीच्‍या माध्‍यमातून शेतक-याला बळ देणारे विचार मांडू शकतात. अधिकाधिक विदयार्थ्‍यांनी शेतक-यांच्‍या प्रश्‍नांशी निगडीत, विषयावरील स्‍पर्धेत सहभागी होणे, शेतक-याचे मनोधैर्य वाढेल असे चिञ काढणे, असे बोधवाक्‍य तयार करणे, असे वक्‍तव्‍य करणे, असे निबंध लिहिणे व त्‍याचा गावागावामध्‍ये प्रसार प्रसार करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

६) गृहिणी, लहान मुले, यांनी आपल्‍याला जमेल त्‍या पध्‍दतीने आपल्‍या दैनिक खर्चात काटकसर करणे व या काटकसरीतून वाचलेला पैसा गरजू शेतकरी कुटुंबातील मुलांच्‍या शिक्षणावर खर्च करणे, दप्‍तरासाठी, पुस्‍तकासाठी, मदत करणे, अत्‍यंत अडचणीत आलेल्‍या शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्ष्‍णसाठी सहकार्य करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

७) घरामध्‍ये मुलगी लग्‍नाला आली की एक प्रकारचे दडपण प्रत्‍येकाच्‍याच मनात निर्माण होते. आधीच शेतक-यांच्‍या समस्‍या अनंत, तेथे पेरणीसाठी पैसे कसे गोळा करावे याचीच त्‍याला विवंचना लागलेली असते, अशातच मुलीचे लग्‍न तोंडावर आले की शेतकरी दादाच्‍या चिंतेत आणखीच वाढ होते. आपल्‍या ओळखीच्‍या शेतकरी कुटुंबामधील मुलगी जर लग्‍नाला आलेली असेल तर अशा मुलीच्‍या लग्‍नासाठी सर्वतोपरी मदत करणे, तिच्‍यासाठी योग्‍य तो वर शेधण्‍यासाठी सहकार्य करणे, सामुहिक विवाह सोहळयामध्‍ये असा विवाह घडवून आणण्‍यासाठी प्रयत्‍न करणे अशा विवाहाला शक्‍य तेवढे सह‍कार्य करणेम्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

८) पेरणी जशी जशी तोंडावर येते तसा तसा शेतकरी दादा बियाणे, खते, याची जमवाजमव करू लागतो. त्‍याची नांगरणी करणे पासुन त्‍याला तयारी करावी लागते. याकरीता त्‍याला पैशाची जमवाजमवही करावा लागते. याकरीता त्‍याला पैशाची जमवाजमवाही करावी लागते. अशा वेळी जर त्‍याला शेताची पेरणी करणे जमले नाही तर त्‍याचे मन खचून जाते. जोपर्यंत काळया आईला पिकाचा हिरवा शालू नेसवल्‍या जात नाही तोपर्यंत बळीराजाचे मन प्रसन्‍न होणार नसते ! अत्‍यंत अडचणीच्‍या स्थितीमुळे ज्‍या शेतक-यांना आपल्‍या शेताची पेरणी करणे जमत नाही अशा शेतक-यांच्‍या शेताची पेरणी लोकसहभागातून करून देणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

९) आपण बोलतांना, वागतांना विविध शब्‍दांचा वापर करत असतो, वाक्‍यप्रचारांचा वापर करत असतो, आपल्‍या बोलण्‍यामधुन वागण्‍यामधून सदैव शेतक-यांच्‍या प्रती आदरभाव व्‍यक्‍त होईल, याची प्रत्‍येकाने काळजी घेणे, शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे, शेतकरी जगला तरच आम्‍ही जगणार आहोत, हिरे, मोती,माणके खाऊन आजवर कोणाचेही पोट भरलेले नाही. जो शेतकरी आमच्‍यासाठी भर उन्‍हामध्‍ये शेतात राब राब राबतो त्‍या शेतक-याच्‍या प्रती शब्‍दातून,कृतीतून सदैव आदरभाव व्‍यक्‍त करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१०) आम्‍ही गणपती उत्‍सव साजरा करतो. आम्‍ही दुर्गादेवी उत्‍सव साजरा करतो. या उत्‍सवामध्‍ये आम्‍ही विविध देखावे निर्माण करतो. या उत्‍सवाच्‍या माण्‍यामातून आम्‍ही बळीराजाला प्रेरणा आणि प्रोत्‍सहन देणारे देखावे निर्माण करू शकतो. गणपती उत्‍सव, दुर्गादेवी उत्‍सव, विविध क्रिडा मंडळे इत्‍यादीच्‍या माध्‍यमातून राबविल्‍या जाणा-या उत्‍सवांमधून शेतक-याच्‍या मनाला उभारी देतील, त्‍याला जगण्‍याची प्रेरणा देईल त्‍याला कठिण परिस्थितीशी करण्‍याची प्रेरणा देईल, असे देखावे निर्माण करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

११) आमच्‍यातील अनेकांना कविता करायला जमते, अनेकांना उत्‍तम लिखाण करता येते, आम्‍ही विविध विषयांवर लिखाण करतो परंतु शेतक-याच्‍या मनाला उभारी देईल असे काव्‍य निर्माण करता आले तर ! जगाचा पोशिंदा असणा-या या बळीराजाला परिस्थितीशी झगडण्‍यासाठी प्रवृत्‍त करणारे साहित्‍य निर्माण करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१२) आम्‍ही शहरी लोक मातीपासून दुरावलो, आम्‍ही शेतापासुन दुरावलो, आम्‍ही शहरामध्‍ये उदयोगधंदा, नोकरी करायला लागलो. शेती आणि शेतक-याशी असणारा आमचा संपर्क क्षीण झाला, हा संपर्क नव्‍याने प्रस्‍थापित करणे, एकातरी शेतक-याला आपला भाऊ मानुन त्‍याच्‍याशी भावकीचा संबंध निर्माण करणे, त्‍याच्‍या सुख दुःखामध्‍ये सहभागी होणे, म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१३) कार्यालयीन कर्मचारी कार्यालयामध्‍ये काम करीत असतात. आपले काम करत असतांना शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना प्रथम प्राधान्‍य देणे, आलेल्‍या शेतक-याला जर त्‍याचा अर्ज लिहीता येत नसेल तर असा अर्ज लिहून देणे, शेतकरी जणू आपल्‍याच कुटूंबातील एक सदस्‍य आहेत. असे समजून त्‍याचे प्रश्‍न प्रथम प्राधान्‍याने कर्मचा-यांनी सोडविणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१४) विदयार्थ्‍यांना खाऊचे पैसे वेळोवेळी मिळत असतात. असे पैसे त्‍यांनी वाचविणे, आणि वाचवलेल्‍या पैशातून एखादया गरीब शेतकरी विदयार्थी मिञाची मदत करणे, त्‍याला वहया, पुस्‍तके, दप्‍तर घेऊन देणे, प्रसंगी त्‍याच्‍या शिक्षणासाठी हातभार लावणे, छोटया – छोटया मुलांनी असा शेतकरी कुटूंबातील विदयार्थांप्रती जिव्‍हाळा द‍र्शविणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१५) विविध मान्‍यवरांच्‍या वाढदिवसाला आम्‍ही पलेक्‍स, बॅनर जागोजागी लावतो. पण आमचा सर्वांचा पोशिंदा असणा-या बळीराजाचा आम्‍हाला विसर पडतो. बळीराजाच्‍या मनाला धिर प्राप्‍त व्‍हावा, त्‍याला प्रेरणा प्राप्‍त व्‍हावी, लढण्‍याची जिदद आणि उमेद प्राप्‍त व्‍हावी, असे पोस्‍टर, बॅनर, घोषवाक्‍य जागोजागी नियमाचे पालन करून लावणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१६) मानसोपचार तज्ञ हे त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या क्षेञात निपूण असतात. ब-याचदा त्‍यांच्‍या पर्यंत पोहोचणे हे अडचणीत असणा-या शेतक-याला शक्‍य नसते, म्‍हणून डॉक्‍टरांनीच स्‍वयंप्रेरणेने सा‍माजिक दायित्‍वाचा ए‍क भाग म्‍हणून स्‍वतःहून अशा शेतक-यांपर्यंत पोहोचणे आणि त्‍यांना आपली सेवा विनामूल्‍य अथवा अत्‍यल्‍प दरात उपलब्‍ध करून देणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१७) सामान्‍य नागरीक, अत्‍यंत गरीबातील गरीब व्‍यक्‍ती, बळीराजा चेतना अभियानामध्‍ये आपले योगदान देऊ शकतो. ज्‍याला काहीच शक्‍य नसेल तो शेतक-याला प्रेरणा देणा-या ग्रामगिता इत्‍यादी ग्रंथामधल्‍या प्रेरणादायी ओवी गेरूने आपल्‍या स्‍वतःच्‍या घराच्‍या भिंतीवर रंगवून या अभियानामध्‍ये सहभागी होऊ शकतो. आपल्‍या घराच्‍या भिंतीवर प्रेरणादायी वाक्‍य लिहून त्‍या माध्‍यमातून शेतक-याला प्ररीत करणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१८) आम्‍ही भजनासाठी, किर्तनासाठी, विविध समारंभासाठी एकञ येतो, यावेळी विचारविनियम करतो, गप्‍पाटप्‍पा करतो. याचवेळी शेतक-याच्‍या उत्‍थाना‍करीता आम्‍ही काय करू शकतो, याबाबतची चर्चा करणे, व त्‍यादृष्‍टीने सकारात्‍मक पावले उचलणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

१९) एकंदरीतच प्रत्‍येकाने मी माझा शेतकरी बांधवासाठी काय करू शकतो ? याचा सखोल विचार करणे व त्‍या आधारे कृतिशील पाऊल उचलणे म्‍हणजे बळीराजा चेतना अभियान !

२०) चला आपण सर्व जण बळीराजा चेतना अभियानामध्‍ये सहभागी होऊ या !

शब्‍दांकन–
श्री. राजेश खवले